8 Questions Asked by Youths (In Marathi)

लग्नाआधी सेक्स करणं योग्य आहे का?
सेक्स किंवा समागम ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणूनदेखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. काहींना ती तीव्रपणे वाटते तर काहींना ती अजिबात वाटत नाही. आदिम काळापासून स्त्री, पुरुष एकमेकांकडे आकर्षित होऊन समागम करत आले आहेत. लग्न किंवा विवाह हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. सेक्स करण्यात चांगलं किंवा वाईट काही नाही. मात्र दोघा जोडीदारांची संमती आणि एकमेकांवर विश्वास मात्र हवा. सेक्स ही एक जबाबदार क्रिया आहे. त्यामध्ये दिवस जाण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे. या जबाबदारीची जाणीव दोघाही जोडीदारांना असणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे यात कुणावरही जबरदस्ती, फसवणूक किंवा शोषण नको.

माझ्या चेह-यावर मुरमे येतात. काय करावे?
वयात आल्यावर शरीरातील संप्रेरकांची पातळी वाढते,म्हणून चेह-यावर मुरमे येतात. पौंगाडावस्थेत हे स्वाभाविक असते. आपला चेहरा तेलकट नसावा; तो नेहमी  कोरडा असावा. वारंवार चेह-याला साबण लावून पाण्याने धुऊन घ्यावा. फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, डाळी, कडधान्ये असलेला सकस आहार घ्यावा. चॉकलेट, आईस्क्रीम, लोणी, तूप असलेला आहार घेणे टाळणे. कॉस्मेटिक्सचा वापर टाळावा. चेह-यावरील मुरमे नखांनी फोडू नयेत. नाहीतर   चेह-यावर व्रण व खड्डे कायमचे राहतात. मुरमे मोठी झाली तर गरम पाण्याचा शेक घ्यावा.

हस्तमैथुन आरोग्यास चांगले की वाईट?
स्वतःच्या जननेद्रिंयाला  स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. शरीरातील टेस्टोस्टरोन या संप्रेरकामुळे (अंतस्त्राव) वारंवार काम उद्दिपित होणे स्वाभाविक असते. वीर्यग्रंथात साठलेला स्त्राव बाहेर टाकणे आवश्यक असते. पुरुष आपल्या लिंगाला हाताने उद्दिपित करुन वीर्यस्खलन होईपर्यंत हस्तमैथुन करतात.
हस्तमैथुनाच्या सवयीमुळे अशक्तपणा येतो, शिश्नाचा आकार लहान होतो, ते वाकडं होतं, लैंगिक क्षमता कमी होते – हे सारे गैरसमज आहेत. हस्तमैथुनापेक्षा हस्तमैथुनाविषयी मनात असलेली भिती, खोलवर रुजलेली अपराधीपणाची  भावना हीच नुकसानकारक असते. लैंगिक ताण फारच जाणवत असेल व अस्वस्थ करत असेल तर स्वैर लैंगिक संबंधाचा-समागमाचा धोका पत्करण्यापेक्षा हस्तमैथुन करुन स्वत:वरचा लैंगिक ताण कमी केला तर काहीही नुकसान होणार नाही. उलट मन शांत होऊन आपल्या दैनंदिन व्यवहारात एकाग्र करणं सोपं जाईल.
लैंगिक भावना नैसर्गिकरीत्या उद्दीपित झाल्यावर हस्तमैथुन केले तर कोणतीही हानी होत नाही. मात्र हस्तमैथुनाचा आनंद घेण्यासाठी कृत्रिमरित्या स्वत:ला पुन:पुन्हा उद्दीपित करायचा चाळा लागला तर काही दिवसांनी शरीर साथ देत नाही.

ब्लू फिल्मस किंवा पोर्नोग्राफिक साहित्य पाहिल्याने मनावर वाईट परिणाम होतो का?
शिवाय लैंगिक समागम व लैंगिकतेविषयी ती पुष्कळ गैरसमजुतींना खतपाणी घालत असते. वाढाळू वयात अनेक किशोरवयीन मुले असे साहित्य पहात असल्याने अनेक पाहणीत दिसून आले आहे. लैंगिक संबंध व लैंगिकतेविषयी पुरेशा, शास्त्रीय माहितीद्वारे त्यांना संवेदनशील बनवल्यास ब्लू फिल्मस वा पोर्नोग्राफीचा दुष्परिणाम होणार नाही. लाजाळू, आपल्या भावना व्यक्त ना करु शकणा-या, दु:ख वा नैराश्यात असणा-या व्यक्ती अशा साहित्याचा आधार घेत असल्याने अभ्यासांती दिसून आले आहे.
ब्लू फिल्म किंवा पोर्नोग्राफी पाहणं हा आपापल्या निवडीचा भाग असू शकतो. अनेकदा अनेकांसाठी लैंगिक संबंधांबद्दल माहिती मिळवण्याचं ते एकमेव साधन असू शकतं. लैंगिकतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल अजूनही आपल्याकडे मोकळेपणाने बोललं जात नाही. मनातल्या शंका मोकळेपणाने कुणाला विचारता येत नाही. अशा वेळी अनेक मुलंमुली पोर्नोग्राफी, ब्लू फिल्म पाहून त्यातून माहिती मिळवतात.  मात्र आपण जे पाहतो त्याचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. अनेकदा अशा चित्रपटांमध्ये लैंगिक संबंध हिंसक पद्धतीने चित्रित केलेले असतात. अशा साहित्यातील माहिती बहुतांश खोटी, अवास्तव, अतिरंजीत असते. त्याहून अधिक धोक्याचे म्हणजे ती  हिंसकतेकडे झुकणारी असते. अनेकदा त्यामध्ये लैंगिक संबंधांबद्दल अवास्तव अशा कृती दाखवलेल्या असतात. त्यातून ब-याचदा लैंगिक संबंधांबद्दल, सेक्सबद्दल विकृत स्वरुपाची किंवा अवाजवी अशा कल्पना तयार होऊ शकतात आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराकडून तशा संबंधांची मागणी होऊ लागते. अशी जबरदस्ती मात्र गैर आहे. सेक्स म्हणजे दोघांनी  परस्परांपासून आनंद घेणे हा विचार,  पण यात पुरुषाने हा आनंद ओरबडून मिळवण्यावर भर दिसतो. त्यामुळे सेक्सकडे पाहण्याचा निकोप दृष्टीच निर्माण होत नाही.  ब्लू फिल्म पाहणं गैर नाही मात्र त्याचा अर्थ लावणं आणि त्यातली विकृती किंवा भडकपणा मात्र टाळता यायला हवा.

किती वेळा सेक्स करावा व कधी करावा?
दिवसातून, आठवड्यातून किंवा महिन्यात किती वेळा संभोग करावा किंवा केला तरी चालेल, हे प्रत्येक व्यक्तीच्या किंवा जोडीदाराच्या मानसिकतेवर, आवडी निवडीवर, लैंगिक ऊर्मीच्या प्रमाणावर अवलंबून असतं. याबाबत कोणत्याही अनुभवाशी तुलना करणं योग्य नाही.
कौटुंबिक परिस्थिती, सवड, सोय, एकांताची संधी, शारीरिक-मानसिक उत्साह, जवळिकीची ओढ यांवर सारं अवलंबून असतं. तसंच किती वेळा संभोग केला, यापेक्षा किती आत्मीयतेनं एकमेकांशी समरस होता आलं, याला खरं महत्व आहे. वयोमानानुसार, परिस्थितीनुसार संभोगाची वारंवारता कमी होत जाते.

मैत्री प्रेम व आकर्षण यात काय फरक आहे?
मैत्री (स्त्रीपुरुषांमधील) यात लैंगिक संबंधांची अपेक्षा किंवा मागणी नसते.
प्रेम आणि आकर्षण यामधे नेमका फरक सांगता येणं काहिसे कठीण आहे. आकर्षण बहुदा समोरच्या व्यक्तींमधील एखाद्याच गुणावर भाळल्यामुळे (निर्माण होते) वाटू शकते, त्यामुळे ते क्षणिकही असू शकतं.  ती व्यक्ती परिपूर्ण आहे असं वाटतं.  आकर्षण स्थिर झाले म्हणजे समोरील व्यक्तीच्या गुणदोषांसकट ओळख पटल्यावरही जर ओढ कायम राहिली तर त्याला प्रेम म्हणता येईल.

सील पॅक काय भानगड आहे नककी?
सील पॅक या शब्दामागे माहिलेची लैंगिकता तपासण्याचा संदर्भ लक्षात येत आहे. सील पॅक म्हणजे योनिपटल. योनीमार्गावर एक पातळ पडदा असतो. त्याला Hymen असेही म्हणतात. या योनीपटलाला मधोमध एक छिद्र असते. काही स्त्रियांमध्ये ते छिद्र मोठं असू शकते. काही वेळॆला एकाच्या ऐवजी दोन-तीन छिद्र असू शकतात. या छिद्रातून मासिक स्त्राव बाहेर येतो. प्रथम संभोगाच्या वेळी हे छिद्र शिश्नाच्या प्रवेशामुळे मोठे होते.(त्याला काही वेळेला चुकीने योनीपटल फाटणे असे म्हणतात). त्यावेळी थोडासा रक्तस्त्राव होऊ शकतो. मात्र असा रक्तस्त्राव न झाल्यास त्या मुलीला लैंगिक अनुभव आहे हे मानने चुकीचे आहे. काही वेळेला हे छिद्र मुळातच मोठे किंवा लवचिक असते किंवा काही शारीरिक हालचालींमुळे मोठे होऊ शकते. मात्र योनीपटलाला सील पॅक म्हणजे चुकीचे आहे. त्यात double moral standard दिसते. मुलगी लग्नाच्या वेळी कुमारी/ कुणाशी पूर्वी शरीरसंबंध न केलेली असायला हवी, तिचे योनीपटल अभंग असायला हवे. अशा धारणा पहायला मिळतात, परंतू मुलग्यांच्या बाबतीत मात्र त्याचा अगोदरचा लैंगिक अनुभवाचा मुद्दा विचारातच घेतला जात नाही. आपणाला याचा नक्कीच विचार करायला हवा.

कुमारवयीन मुलांमध्ये भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल जास्त आकर्षण का असते?
किशोरवयीन मुलग्यांमध्येच नाही तर किशोरवयीन मुलींमध्ये सुदधा भिन्नलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण निर्माण होते.हे लक्षात घ्यायला हवे. ही निसर्गाची जादू आहे. सजीव सृष्टीत वंशसातत्य रहावे ही निसर्गाची योजना. पण जननसंस्थेच्या कार्याला सुरुवात होती ती वाढाळू वयात किशोरावस्थेत. बाकी सर्व संस्थांचं कार्य जसे -श्वसन,रुधिराभिसरण, इ. जन्मापासून सुरु होतं. त्यामुळे शारीरिक बदल घडून येतात. तसेच लैंगिक प्रेरणा निर्माण होतात. पण पुनरुत्पादन व्हायचे तर नर मादींचे मिलन व्हायला हवे, तेवढ्यासाठीच निर्माण झाली आहे. ही परपस्परांची ओढ परिणामत: या वयात काही भावनांची जाणीव नव्यानेच व्हायला लागते. कोणाकडे तरी वळून पाहावं, कोणीतरी आपल्याकडे वळून पाहावं असं वाटायला लागते. भिन्नलिंगी व्यक्तींशी भावनिक जवळील साधावीशी वाटायला लागते, सहवास हवाहवासा वाटतो. त्यात कळत-नकळत स्पर्शाचीही ओढ असते. किशोरावस्थेत सजातीय नरमादींमध्ये आकर्षण निर्माण होणे हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो.

Like and Share

Amol Kale

youth mentor and trainer, also working as Project Coordinator at MAVA. done Masters in Social Work from Bharati Vidyapeeth, Pune and thereafter working with adolescent boys and young men on gender across Maharashtra for past 6 years.

2 thoughts on “8 Questions Asked by Youths (In Marathi)

 • January 15, 2017 at 3:24 PM
  Permalink

  अतिशय उपयुक्त माहिती, नेमक्या शब्दात मांडली आहे.

  Reply
 • February 4, 2017 at 9:59 PM
  Permalink

  खूप योग्य आणी महत्वाचे आहे

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)